img
img
blog

17 February 2023

सिक्किमची सफर करताना हे पारंपरिक पदार्थ चाखायलाच हवेत

भारत हा असा एक देश आहे जिथे विविध संस्कृतीत एकाच ठिकाणी नांदतात. प्रत्येक राज्यात विविध संस्कृती, भाषा, भौगोलिक परिस्थिती आणि पेहराव पाहयला मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध प्रातांत विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ खाल्ले जातात. तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणानुसार हे पदार्थ बनवले जातात. नुकतीच सिक्किम राज्यात पर्यटन करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे इथल्या संस्कृतीसोबतच इथले काही खास खाद्य पदार्थदेखील चाखता आले. जाणून घेऊ या सिक्किम राज्यात गेल्यावर कोणते पारंपरिक पदार्थ टेस्ट करायलाच हवेत. 

सिक्किम राज्यातील काही प्रसिद्ध खाद्य पदार्थ

सिक्किमच्या खाद्यसंस्कृतीवर नेपाळी आणि तिबेटी संस्कृतीचा पगडा दिसून येतो. शिवाय इथल्या थंड हवामानात तग धरून ठेवण्यासाठी काही खास पारंपरिक पदार्थ इथे खाल्ले जातात. साधारणपणे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ इथे उकडून बनवण्याची पद्धत आहे.

मोमोज

मोमोज आजकाल इतके प्रसिद्ध आहेत की भारतात कुठेही तुम्हाला ते खायला मिळू शकतात. मात्र हा पदार्थ मुळचा तिबेटी असून नेपाळी खाद्यसंस्कृतीमध्ये जास्त लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील मोदकाप्रमाणे वाफवलेला हा पदार्थ असला तरी यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन प्रकार पाहायला मिळतात. मूळ पारंपरिक मोमोजमध्ये मांस उकडवले जात असेल मात्र आता यात निरनिराळे प्रकार चाखायला मिळतात. शाकाहारींसाठी पनीर, टोफू, चीज, भाज्यांचा वापर केला जातो. त्यामुळे जर सिक्कीममधील गंगटोकमध्ये गेला तर एम जी रोडवरील रोल हाऊस आणि टेस्ट ऑफ टिबेटमध्ये मोमोज जरूर खा. मीदेखील नुकताच रोल हाऊसमधील मोमोजचा मस्त आस्वाद घेतला.

थुकपा

थुकपा हा देखील सिक्किममधील एक खास पारंपरिक पदार्थ आहे. सिक्किममध्ये स्ट्रीट फूडची संस्कृती जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेलाही तुम्हाला सहज थुकपा खाता येतो. थुकपा हा एक न्यूडल्स सूपचा प्रकार असून त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मांस, अंडी, भाज्या आणि स्वादिष्ट न्यूडल्स असतात. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात तुम्हाला थुकपा खायला मिळतो.

शा फले

शा फले हा देखील सिक्किममध्ये आवडीने खाल्ला जाणारा एक पदार्थ आहे. रस्त्याच्या कडेला तुम्हाला शा फले विकणारे विक्रेते सिक्किममध्ये जागोजागी दिसतात. मांस, खिमा आणि कोबीचे स्टफिंग असलेला तळलेल्या कंरजीसारखा दिसणारा पदार्थ असून हा मुख्य तिबेटियन पदार्थ आहे. आजकाल शाकाहारी लोकांसाठी यामध्ये टोफू, पनीर आणि भाज्यांचे स्टफिंग भरले जाते. बाहेरील बाजूने तळलेला क्रिस्पी असून आतून मात्र मऊ आणि ज्युसी स्टफिंग तुम्हाला खायला मिळते. हा पदार्थही तुम्हाला गंगटोकमधील रोल हाऊसमध्ये खायला मिळू शकतो. 

डाळ भात 

सिक्किममधील लोकांचे मुख्य अन्न डाळ आणि भात हे आहे. उकडलेल्या भातासोबत डाळीचे सूप पिण्याची इकडे पद्धत आहे. डाळभातसोबत तुम्हाला खास इथे स्थानिक भाज्यांची करी मिळते. भारतात अनेक ठिकाणी डाळ भात खाल्ला जात असला तरी सिक्किमधील डाळभाताची चव इतर ठिकाणांपेक्षा नक्कीच निराळी असते. कारण प्रत्येक ठिकाणी डाळ, भाजी बनवण्याची पद्धत आणि मसाले निरनिराळे असतात.

सिन्की

सिन्की हा पदार्थ इतर पदार्थांपेक्षा थोडा वेगळा आहे कारण यामध्ये निरनिराळ्या मुळांचा वापर केला जातो. हा पदार्थ बनवण्याची पद्धतदेखील खास आहे. लाल रंगाच्या मुळांपासून ही डिश बनवली जाते. ही मुळं कापून बांबूच्या भांड्यात बंद करून ठेवली जातात. घट्ट झाकण लावून हे भांडं एक महिना झाडाच्या फांद्या अथवा मातीखाली गाढून ठेवलं जातं. त्यानंतर एक वर्षभर ते मुरत ठेवतात.  त्यानंतर मुरलं की सूपमध्ये वापरतात.  सूप सिंकी हा इथला एक प्रसिद्ध पदार्थ आहे. थंडीपासून वाचण्यासाठी हे सूप पिणं खूप गरजेचं असतं. 

सेल रोटी

सिक्किममध्ये गेल्यावर तुम्ही सेल रोटी नाही खाल्ली तर काहीच मजा नाही. तांदळाच्या पिठापासून ही रोटी बनवली जाते. यासाठी तांदूळ स्वच्छ करून पाण्यात भिजत ठेवले जातात. ज्यामुळे ते अधिक पौष्टिक होतात. त्यानंतर दळलेल्या पिठात वेलची आणि साखर टाकली जाते. मिश्रणाच्या जिलेभीप्रमाणे गोल आकारच्या रोटी बनवून त्या डिप फ्राय केल्या जातात. सिक्किममध्ये सणासुदीला सेल रोटी घरोघरी बनवली जाते.

गुन्द्रुक 

गुन्द्रुक हा सिक्किममधील मुख्य नाश्ता आहे. गुन्द्रुक हे नेपाळचे मुख्य अन्न असून सिक्किमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा पदार्थ शाकाहारी असून मोहरी, कोबी अथवा मुळ्याच्या पानांपासून बनवला जातो. पारंपरिक असल्यामुळे तुम्हाला स्थानिकांच्या घरीच फक्त गुन्द्रुक खायला मिळू शकतं. कारण सिक्किममध्ये तो पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यात बनवला जातो. अनेक पोषक घटक असल्यामुळे यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. 

ढिंडो

ढिंडो उकळत्या पाण्यात पीठ टाकून सतत काठीने हलवत बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. बाजरी अथवा इतर धान्याच्या पीठापासून तो बनवला जातो.  हा पदार्थ बनवण्यासाठी खास लोखंडी कढई वापरली जाते.  थोडक्यात पिठाची उकड काढून केला जाणारा ढिंडो पानात डाळीचे सूप अथवा एखाद्या चटणीसोबत वाढला जातो. सिक्किम अथवा नेपाळमध्ये दररोज हा पदार्थ घरोघरी खाल्ला जातो. 

खप्सी 

खप्सी ही एक तळलेली पेस्ट्री असते. साधारणपणे गोड आणि खारट चवीचा पदार्थ आहे.सिक्किममध्ये खास कार्यक्रमांना घरात हा पदार्थ बनवला जातो. तिबेटीयन लोकांमध्ये लग्नकार्यात खप्सी बनवली जाते. पिठाचा पदार्थ असून त्याला निरनिराळे आकार दिले जातात. अधिक आकर्षक करण्यासाठी त्यामध्ये विविध रंगाचा वापर केला जातो.

किनिमा करी

किनिमा करी हा एक लोकप्रिय सिक्किमी पदार्थ आहे. भातासोबत किनिमा करी वाढली जाते. किनिमा ही सोयाबीनपासून बवलेली करी असून उन्हात सुकवलेल्या सोयाबीनचा स्वाद अप्रतिम लागतो. थंडीत शरीराला पोषण मिळण्यासाठी शाकाहारींसाठी हा एक चांगला पदार्थ मानला जातो. मांसाला पर्याय म्हणून सिक्किममध्ये सोयाबीन खाल्लं जातं. सोयाबीन्स उकडून ते आंबवले जातात. ज्यामुळे त्याला किणवल्यामुळे एक प्रकारचं चिकट टेक्स्चर येतं. नेपाळ आणि दार्जिंलिंगमध्येही किनिमा आवडीने खाल्ला जातो. 

Share: