img
img
blog

17 February 2023

हिल स्टेशनवर फिरायला जाताना या गोष्टी तुमच्या बॅगेत असायलाच हव्या

उन्हाळा सुरू झाला की मुलांना सुट्टी लागते. त्यामुळे समर वेकेशनमध्ये कुटुंबासोबत फिरायला जाण्याची मजाच निराळी असते. शिवाय अशा काळात मुंबई-पुण्यातील वातावरणात उष्णता वाढल्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत नक्कीच आखला जातो. थंड हवेची ठिकाणं ही उंच पर्वत रांगामध्ये वसलेली असल्याने तिथे गारवा असतोच पण बऱ्याचदा बर्फही पडतो. अशा वेळी काही खास कपडे आणि गोष्टी तुमच्या बॅगेत असायला हव्या. यासाठीच जाणून घ्या हिल स्टेशनवर वेकेशनसाठी जाताना कशी पॅकिंग करावी.

स्वेटर, लेदर जॅकेट अथवा विंडशिटर

थंड हवेच्या ठिकाणी वातावरणात अचानक बदल होत असतात. कधी पाऊस तर कधी अचानक गारवा वाढण्याची शक्यता असते. बऱ्याचदा काही पर्यटन स्थळं ही बर्फाच्छादित असतात. अशा वेळी तुमच्या जवळ लेदरचे जॅकेट, विंड शिटर अथवा कमीत कमी एखादं ऊबदार स्वेटर असायलाच हवं. आजकाल अतिशय स्टायलिश ऊबदार कपडे विकत मिळतात. ज्यामुळे तुम्ही स्टायलिश दिसताच पण तुमचे थंड हवेपासून संरक्षणही होते.

थर्मल्सचे जोड

थंड हवेच्या ठिकाणी जाताना थर्मल्सचे काही जोड नेणं खूप गरजेचं आहे. कारण थर्मल्स तुम्ही जर तुमच्या कपड्यांच्या आत घातले तर तुम्ही स्टायलिश दिसालच पण तुम्हाला गारव्याचा त्रासही होणार नाही. विशेषतः अशा ठिकाणी गेल्यावर ज्यांना पंजाबी सूट, साडी अथवा फॉर्मल्स कपडे घालायचे असतात त्यांनी थर्मल्स कॅरी करायलाच हवेत. जिथे अति थंडी नसेल तिथे तुम्ही तुमच्या इतर कपड्यांसोबत थर्मल्स घालून काम भागू शकते. 

शॉल,स्टोल आणि मफलर

थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर कधी कधी वातावरण इतकं गारठतं की, तुम्ही कितीही कपडे वापरले तरी कमीच वाटतं. अशा वेळी जास्तीचे कपडे नेणं शक्य नसेल तर कमीत कमी एखाद दुसरी शॉल, स्टोल अथवा मफलर असायलाच हवा. वास्तवित शॉल, स्टोल आणि मफलरमुळे तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर निरनिराळे ट्रेंडी लुक्स करता येतात. शिवाय विंडशिटर अथवा जॅकेटपेक्षा कमी जागा लागत असल्यामुळे तुमचं सामान वाढत नाही.

ग्लोव्ज, मोजे आणि कानटोपी

ग्लोव्ज, मोजे आणि बिनी अथवा कानटोपी घालणं अशा वातावरणात मस्ट आहे. जर तुम्ही बर्फ असलेल्या ठिकाणी गेला तर तुम्हाला बर्फात घालण्यासाठी योग्य असे मोजे आणि ग्लोव्ज वापरावे लागतात. मात्र इतर ठिकाणी तुम्ही फक्त लोकरीचे मोजे अथवा ग्लोव्ज नक्कीच वापरू शकता. बिनी अथवा कानटोपीमुळे तुमच्या कानात थंड वारं शिरत नाही. स्टायलिश दिसण्याचा आणि थंडीपासून बचाव करण्याचा हा मस्त पर्याय आहे. कानटोपीचा कंटाळा असेल तर आजकाल स्टायलिश इअर मफ्स मिळतात ते ट्राय करा.

चालण्यासाठी योग्य शूज

उंच ठिकाणी फिरताना तुम्हाला चढ उतारावर खूप चालावे लागते. शिवाय डोंगररांगामध्ये हायकिंग, क्लायम्बिंग सारख्या अनेक उत्साहवर्धक अॅक्टिव्हिटीज कराव्या लागतात. अशा वेळी चांगले ब्रॅंडेड आणि पायासाठी आरामदायक शूज तुमच्याजवळ असायलाच हवे. जर तुम्ही बर्फाळ प्रदेशात फिरणार असाल तर मात्र तुम्हाला स्नो शूजच वापरायला हवेत. ज्यामुळे तु्म्ही घसरून पडण्याची शक्यता कमी होते. 

बॅगपॅक 

तुम्ही पॅकिंग करताना कितीही चांगल्या बॅग्स कॅरी केल्या तरी अशा वेळी तुमच्या जवळ एक बॅगपॅक असायला हवी. कारण फिरताना तुमच्या खांद्यावर अथवा पाठीवर या बॅगमुळे ताण येत नाही. ओझं नियंत्रित ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे. शिवाय अशा बॅगमध्ये तुमचे गरम कपडे, पाण्याची बाटली, खाऊचे सामान सगळं सहज राहू शकतं. 

छत्री

आता फिरताना छत्री कशाला असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. पण जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरताय मग छत्री तुमच्या गरजेची गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा वातावरणात बदल झाल्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी अचानक पाऊस पडू लागतो. शिवाय इथे पडणारा पाऊस हा चांगलाच मुसळधार आणि थंडगार असतो. म्हणूनच तुमच्या प्रवासाचा मूड खराब होऊ नये यासाठी जवळ एक छोटी का होईना छत्री ठेवा.

Share: